Income Tax Raid Pune: पुण्याच्या कर्वेनगरमधील 'स्वप्नशिल्प सोसायटीमध्येही' आयकर विभागाचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:13 PM2021-10-07T14:13:19+5:302021-10-07T14:16:55+5:30
साखर कारखाना प्रकरणात कर्वेनगरमधील सोसायटीत सकाळीच पोहचले पथक
पुणे : आयकर विभागाकडून पुणे शहरातही गुरूवारी सकाळी कर्वे नगरमधील एका सोसायटीतील सदनिकेवर छापा घालण्यात आला. साखर कारखाना व्यवहारातील कारणावरून हा छापा मारण्यात आल्याचे समजते. कर्वे नगरमधील या सोसायटीत सकाळीच आयकर विभागाचे पथक साध्या वेशात पोहचले. त्यांच्याबरोबर पोलिसांचीही एक गाडी होती.
या सोसायटीतील डी इमारतीमधील बरोबर नेमक्या सदनिकेत पथकातील अधिकारी गेले. राज्यातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाची ही सदनिका आहे. पथकाने लगेचच कुटुंबप्रमूखाला माहिती देत विचारणा करण्यास सुरूवात केली. कोणालाही या छाप्याविषयी काही कळणार नाही याची काळजी पथकाने घेतली होती, मात्र थोड्याच वेळात सोसायटीत सर्वांनाच ही गोष्ट समजली.
एक सहकारी साखर कारखाना नातेवाईकाच्या खासगी नावावर स्वस्तात विकत घेतल्याचे प्रकरण गाजते आहे. त्याचा या छाप्याशी संबध असल्याची चर्चा आहे. छाप्यात बराच वेळ अधिकार्यांकडून विचारणा करण्यात येत होती. त्याचा तपशील समजला नाही, मात्र कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे समजते. आयकर विभागात चौकशी केली असता तिथून छापा मारणे, चौकशी करणे यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील छाप्याविषयी काहीही माहिती नाही असे स्पष्ट करण्यात आले.