पुणे : शहरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची गुरुवारी सकाळपासूनच छापेमारीला सुरुवात झाली आहे. हडपसर, मगरपट्टा आणि बाणेर येथील दुकानांसह घरामध्ये देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. आयकर विभागाच्या ४० अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. अनेकदा ज्वेलर्सच्या दुकानातून जीएसटीच्या पैशांचा भरणा करण्यात आलेला नसतो, अथवा रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात व्यवहार केले जात असतात. अशाच व्यवहारातील तफावतीची माहिती नीलकंठ ज्वेलर्स संदर्भात आयकर विभागाकडे होती. या माहितीच्या आधारे गुरुवार सकाळपासूनच आयकर विभागातर्फे छापेमारीला सुरुवात करण्यात आली. दुकानातील कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. अजून किती वेळ ही छापेमारी चालेल हे अद्याप समजलेले नाही.