तळेगाव ढमढेरे : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहातील तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अधीक्षकांना फक्त ८०० रुपयांनी वाढ केली आहे. स्वयंपाकी व चौकीदाराला मात्र, दुप्पट वाढ केली असल्याने अधीक्षकांवर अन्याय असून पदानुसार मानधनात वाढ करावी, अशी मागणी तळेगाव ढमढेरे येथील समता विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी यांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे येथील समता विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी यांनी सांगितले की, वास्तविक अधीक्षक हे पद सर्वात वरीष्ठ असल्याने या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मानधन व मानधनातील वाढ ही अन्य पदांपेक्षा जास्त असते. मात्र आघाडी सरकारने स्वयंपाकी व चौकीदार यांच्यापेक्षाही अधीक्षकांना कमी मानधनवाढ देऊन त्यांची बोळवण केल्याने राज्यभरातील सर्व अधीक्षकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली असून अन्य पदांपेक्षा जास्त म्हणजे किमान १ हजार ८०० रुपये वेतनवाढ द्यावी, अशी मागणी वसतिगृह अधीक्षक शंकर मुनोळी व भागवत गोल्डी यांनी केली आहे.
अधीक्षक मुनोळी म्हणाले की, सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत बुधवारी (९ जून) महाविकास आघाडी सरकारने मानधनवाढीचा अजब निर्णय घेतला. अनुदानित वसतिगृहात अधीक्षक, स्वयंपाकीण, चौकीदार, मदतनीस कर्मचारी कार्यरत असतात. वसतिगृह प्रमुख म्हणून वसतिगृहाची पूर्ण जबाबदारी अधीक्षकावर असते, असे असतानाही अधीक्षकांच्या मानधनात फक्त ८०० रुपये, तर स्वयंपाकी यांच्या मानधनात १ हजार ६०० रुपये, चौकीदार व मदतनीस यांच्या मानधनात १ हजार ७५० रुपये वाढ केली आहे.
सरकारच्या या विसंगत निर्णयाचा पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ८० वसतिगृह अधीक्षकांना या अन्यायकारक वाढीचा फटका बसणार असल्याने निदान मदतनीसापेक्षा तरी जास्त म्हणजे किमान १ हजार ८०० रुपयांची मानधनात वाढ द्यावी, अशी मागणी मुनोळी यांनी केली आहे.