लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील पक्षीप्राणी यांची दुकाने व त्यांचे ग्राहक यांना कोरोना निर्बंधांची वेळ गैरसोईची झाली आहे. अशा दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करून त्यांना दुकान दिवसभर खुले ठेवण्याची सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.
पक्षी, प्राणी, मासे यांची विक्री करणारी नोंदणीकृत ५०० तर नोंदणी नसलेली अनेक दुकाने आहेत. त्यांच्याकडून विक्री तर होतेच शिवाय अशा पाळीव पक्षी, प्राण्यांना लागणाऱ्या औषधांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व सेवाही दिली जाते. त्यावरच कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. अन्य दुकानांप्रमाणेच यांनाही आपले दुकान सकाळी ७ ते ११ असेच खुले ठेवावे लागते.
या वेळात पक्षी, प्राणी यांच्यासाठी कोणीही बाहेर पडत नाहीत. एखाद्या ग्राहकाकडील प्राण्याला तातडीने गरज असेल तर सेवा पुरवताना अडचण होते. दुकान ११ नंतरही खुले ठेवले तर पोलिसांकडून दंड केला जातो. कोरोनामुळे आधीच विक्री थांबली आहे. सेवा पुरवण्यावरच व्यवसाय चालतो आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेमुळे त्यावरच निर्बंध आले. त्यामुळे दुकान सुरू असूनही बंद असल्यासारखेच आहे, असे चालक सांगतात.
प्राणी, पक्षी, मासे यांची व त्यांना लागणाऱ्या साहित्याची विक्री ही अत्यावश्यक सेवाच आहे. कोरोनात घरी बसलेल्या नागरिकांसाठी हा घरात बसायला लावणारा विरंगुळा आहे. त्यामुळे औषधांच्या दुकानांप्रमाणेच या दुकानांना २४ तास नाही; पण दिवसभर खुले ठेवण्याची सवलत द्यावी, असे चालकांचे म्हणणे आहे.
---//
अनेक समस्यांनी हैराण
कोरोनाने संपूर्ण व्यवसायच थांबला आहे. खाद्यान्नाच्या गाड्यांपासून अनेक गोष्टींचे नियोजन करायला लागत आहेत. दुकान दिवसभर खुले ठेवण्याची परवानगी मिळाली तर अनेक समस्या सुटतील.
- अनय जोशी, व्यावसायिक
----///
वेळ वाढवून द्यावी
ज्यांच्याकडे मांजर, कुत्रे दिले आहेत. त्यांच्यासाठी सेवा द्यावीच लागते. दुकान बंद आहे असे सांगून चालत नाही. त्यांना लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी दुकान खुले केले की कारवाई होते. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची गरज आहे.
राहूल पारखी, व्यावसायिक