लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या रुग्णांची वाढ सातत्याने होत असून, शुक्रवारी १ हजार ८०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ आढळून आली आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून तपासणीच्या तुलनेत साडेसतरा टक्के असलेला पॉझिटिव्ही रेट आज २०.९८ टक्क्यांवर गेला आहे़
आज दिवसभरात शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये ८ हजार ६०२ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून आढळलेले संशयित, बाहेरगावी प्रवास करताना आवश्यक असलेला ‘आरटीपीसीआर’ कोरोना तपासणीचा रिपोर्ट, खाजगी आस्थापनांमध्ये बंधनकारक केलेली कोरोना तपासणी यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना तपासणीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे़
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या राज्यात सर्वाधिक पुण्यात दररोज वाढत आहे. इतर शहराच्या तुलनेत पुण्यात सक्रिय रूग्णांचा आकडा दहा हजारांपर्यंत गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ९ हजार ७४० इतकी झाली आहे़ यापैकी ७८६ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त ३४१ रूग्ण हे गंभीर आहेत़ आज दिवसभरात ५९८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़
शहरात आजपर्यंत १२ लाख २९ हजार ५०२ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी २ लाख १४ हजार ८३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख १६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ९२५ जणांचा मृत्यू झाला आहे़