पुणे : शहरात बुधवारी ३०७ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ४५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ४४७ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८़९० टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी २२५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ८६० इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आज पुन्हा ५ हजाराच्या आत आली आहे. आजमितीला शहरात ४ हजार ८७५ सक्रिय रूग्ण आहेत़ आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५८८ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ९२ हजार ७९३ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७६ हजार ७६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६७ हजार ३०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़