भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक भातशेती करत आहेत. सध्या भातशेतीला मजुरांची कमतरता, खते बियाणे यांचे वाढलेले दर व मजुरांकडून काम करून घेताना लागणारा वेळ असे प्रश्न आहेत. पारंपरिक पद्धतीने भातशेती करताना शेतकरी बियाण्यांचे व खतांचे प्रमाण खूप वापरतात, भाताची लावणी व काढणी करण्यासाठी मजूर खूप प्रमाणात लागतात. त्यामुळे मजुरी, वेळ, खते बियाणे आदींची बचत करण्यास तसेच या अडचणींवर मात करण्यासाठी भात शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे हा एक उत्तम पर्याय असल्याने शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळत आहेत.
प्रगतशील शेतकरी लहू हरिभाऊ शेलार यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाच्या (आत्माच्या) सहकार्याने सन २०१७ च्या खरीप हंगामात यांत्रिकी भात लागवडीचे प्रात्यक्षिक राबविले. त्यामध्ये त्यांना यश आले. यांत्रिकी भात लागवडीचे फायदे लक्षात आल्यानंतर लहू शेलार यांनी स्वतः भात लावणी यंत्र खरेदी केले. मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या सहकार्याने लहु शेलार यांनी भोर तालुक्यातील मौजे हातवे, मोहरी, निगडे, कामथडी, माळेगाव, नसरापूर, मोरवाडी, कासुर्डी खेबा, उत्रौली, शिंदेवाडी,नाटंबी, बाजारवाडी, खानापूर, नेरे, पाले, गोकवाडी या गावांमध्ये यांत्रिकी भात लागवड यशस्वी राबविली आहे.
यांत्रिकीकरणाव्दारे भात लागवड करणे यामध्ये प्रमुख तीन टप्पे असतात भाताची आधुनिक रोपवाटिका तयार करणे,
लागवडीसाठी जमीन तयार करणे (चिखलणी करणे),भात लागवड यंत्राद्वारे लागवड करणे यामध्ये रोपवाटिका तयार करणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. रोपवाटिका तयार करण्याचे प्रात्यक्षिके निवडलेल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना करून दाखविले गेले व त्यांच्याकडून रोपवाटिका तयार करून घेतल्या त्यानंतर लागवड यशस्वी करून दिली आहे.
यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ, श्रम व मजूर यामध्ये बचत झाली व उत्पन्नात वाढ झाली आहे. यांत्रिकी भात लागवडीची मोहीम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषि अधिकारी हिरामण शेवाळे, मंडळ कृषि अधिकारी राजेंद्र डोंबाळे, तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषि पर्यवेक्षक विजय शिशुपाल, कृषि सहाय्यक अमर चव्हाण, विष्णू शिणगारे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
--
कोट -१
भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७ हजार ५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. तालुक्यात यांत्रिकी पध्दतीने वीसगाव खोरे, आंबवडे भाग व हातवे पट्ट्यातील सुमारे २५ ते ३० गावांतील ९० एकरवर यांत्रिकी पध्दतीने लागवड करण्यात आली असून, तालुक्यात यांत्रिकी पध्दतीने भाताची लागवडीत वाढ होत आहेत.
लहू शेलार
उपसभापती, भोर पंचायत समिती
--
फोटो क्रमांक: ३० लहू शेलार
फोटो ओळी : यांत्रिकी पध्दतीने भातलागवड करताना शेतकरी