पुणे : शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता खाटांची उपलब्धता वाढविण्यात यावी. तसेच आवश्यक सर्व उपाययोजना करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केली आहे. जम्बो रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासोबतच व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पालिकेच्या हेल्पलाइन सेवेबाबत तक्रारी वाढल्या असून ऑपरेटर फोन उचलत नाहीत. त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांना या सेवेचा लाभ व्हावा, या दृष्टीने कार्यवाही करावी. खासगी रुग्णालयातील किमान ८० टक्के खाटा कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवाव्यात. तसेच या खाटा ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
ज्यांना गृहविलगीकरणात राहणे शक्य नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात यावेत. जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहू शकतात त्यांचे आणि नातेवाईकांचे प्रबोधन करावे. जेणेकरून अत्यवस्थ व अन्य आजार असलेल्या कोरोना रुग्णांसाठी अधिक खाटा उपलब्ध होतील असेही पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.