पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांपेक्षा भाजपची ताकद कशी वाढले यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महायुतीत नव्याने दाखल झालेल्या घटक पक्षांच्या मदतीने ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल, विजयासाठी कोणत्या गोष्टींवर काम करावे लागेल, यावरही बैठकीत मंथन झाले. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची ही बैठक झाली.
आगामी लोकसभा निवडणूक भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट एकत्रित लढविणार आहे. लोकसभेसाठी महायुतीने राज्यातून ४५ जागांचे लक्ष्य ठेवले असून, त्या दृष्टीने ही बैठक झाली. याला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी. एल. संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील पक्षाचे आणि संघटनेतील सत्तर प्रमुख नेतेच या बैठकीला आमंत्रित केले होते. याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीला उपस्थित असणाऱ्यांचे मोबाइलदेखील काढून घेण्यात आले होते.
भाजपकडून सध्या राज्यभरात राम जन्मभूमी, सुपर वॉरिअर्स यांच्यासह विविध प्रकारचे सहा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा आढावादेखील या बैठकीत घेण्यात आला.