लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील कचरा प्रकल्पासाठी ठिकठिकाणी काही जागा संपादित करण्याची गरज आहे. या जागा उपलब्ध होण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे सांगितले. दरम्यान, शहरातील कचरा प्रकल्पांची क्षमता वाढविणार असल्याचे त्यांनी सूचित केले.बापट यांनी रविवारी शहरातील विविध कचरा प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी आयुक्त कुणाल कुमार, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती सभापती मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यांनीदेखील प्रकल्पांना भेट दिली. उरुळी देवाची, फुरसुंगी येथील ग्रामस्थांकडून तेथे कचरा टाकण्यास विरोध होत आहे. यामुळे पुण्यातला कचऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. यासाठी शहरातील कचरा प्रकल्पांची क्षमता वाढवून शहरातल्या कचऱ्याची शहरातच विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. यासाठी बापट यांनी सूस रोड, वडगाव, धायरी, रामटेकडी आदी प्रकल्पांना भेटी देऊन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.वडगाव येथील प्रकल्पाला भेट दिल्यानंतर या प्रकल्पाच्या बाजूला असणारी जमीन प्राप्त करून या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हडपसर रामटेकडी येथील आणखी २३ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी आणखी कचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येवू शकतात, त्यामुळे या जागा ताब्यात घेण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कचरा प्रकल्पांची क्षमता वाढवणार
By admin | Published: May 15, 2017 6:48 AM