पुणे : भारताने आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र बनावे ,या उद्देशाने केंद्र शासनातर्फे प्रयत्न केले जात असून नवीन शैक्षणिक धोरणातही त्यादृष्टीने महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अल्युमनी कनेक्ट अंतर्गत सर्व विद्यापीठांनी परदेशातील व भारतातील माजी विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवा, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे.
सर्वच शैक्षणिक संस्थांसाठी माजी विद्यार्थी हे भक्कम आधार असतात. त्यांच्याकडून आर्थिक व इतर सहकार्य मिळू शकते. त्याचप्रमाणे भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेवून सध्या परदेशात असणारे माजी विद्यार्थी उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठांनी भारतातील व परदेशातील माजी विद्यार्थ्यांची माहिती जमा करावी, त्यांना विविध कार्यशाळा व वेबिनारमध्ये सहभागी करून घ्यावे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांची संपर्क साधावा, माजी विद्यार्थ्यांच्या सल्ल्याने शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवावा, असे परिपत्रक युजीसीने प्रसिध्द केले आहे.