नम्रता फडणीस / पुणेनोटबंदीच्या निर्णयानंतर गेल्या तीन महिन्यांत नेट बँकिंगच्या गुन्हयात वाढ झाली आहे, तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीच्या तक्रारींही लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. सायबर सेलकडे तक्रारींचे १३७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात तक्रारींचे प्रमाण हे २ हजार इतके होते. नेट बँकिंगद्वारे आर्थिक फसवणुकींसह सोशल मीडियावर बदनामीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत चालल्याने सायबर सेलपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मोबाईलवरच्या चॅटिंगमधून टकटक करणारी अनेकांची बोट नोटाबंदीच्या निर्णयानंतर ‘नेट बँकिंग’ व्यवहाराकडे वळली आणि कॅशलेसच्या दिशेने प्रवास सुरू झाला. बँकांकडून क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड घेतली, मात्र हे व्यवहार करताना साधी चूकही नडू शकते, नेट बँकिंगचे व्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत लोकांमधील जागरूकतेच्या अभावामुळे गुन्हेगारांच्या हातात आयतेच कोलित मिळाल्यासारखे झाले आहे. नेट बँकिंग व्यवहार करणाऱ्या लोकांची अकाऊंट हॅक करून फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. तसेच सोशल मीडियाच्या दुधारी शस्त्राचा वापर करत तरुणींची आक्षेपार्ह छायाचित्र अथवा मजकूर टाकून बदनामी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्स अॅप यांसारख्या संवादाची दालने खुली करणाऱ्या या सोशल माध्यमांनी जगभरातील माणसांना जवळ आणले असले तरी वैयक्तिक माहितीचा डेटा सहजपणे उपलब्ध केला जात असल्याने तरुणींची बदनामी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. तरुणींचे फेसबुक आणि व्हॉट्स अॅप हॅक करून त्यांची अश्लील छायाचित्रे, मजकूर पाठविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१६ मध्ये मेल हॅकिंग ९०, फेसबुक अकाऊंट हॅकिंग ९७, व्हॉट्स अॅपद्वारे बदनामीच्या ७८ घटना घडल्या आहेत. तर २०१७ मध्ये मेल हॅकिंग ४४, फेसबुक हॅकिंग ५४ व्हॉट्स अॅपवरील बदनामीच्या ५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोशल मीडियावरील बदनामीच्या बहुतांश घटना या जवळच्या व्यक्तींकडूनच नोंदविल्या जातात. म्युच्युअल फ्रेंड आहे, म्हणून पासवर्ड किंवा यूआरएल लिंक शेअर करणे अशा गोष्टी नकळतपणे घडतात, त्यातूनच फेसबुक आणि व्हॉट्स अॅप हॅक करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
नोटाबंदीनंतर सायबर गुन्ह्यांंमध्ये वाढ
By admin | Published: April 24, 2017 5:15 AM