लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहरातील प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजना योजनेसाठी अर्ज करावयाचे आहे. महापालिकेने अर्ज सादर करण्यासाठी १६ मेपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु, नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अर्ज सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका प्रधानमंत्री आवास योजना राबविणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपले घर असावे, असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत माफक दरात घर मिळेल यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले आहे. यासंदर्भात स्थायी समितीच्या अध्यक्षा सावळे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाकडे स्वत:च्या मालकीचे घर असावे, हे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी सर्वांसाठी घरे देण्याची प्रधानमंत्री आवास योजना त्यांनी जाहीर केली आहे. ही योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत किती नागरिकांना घरे हवी आहेत, याचे सर्वेक्षण महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत.शहरातील नागरिक पण शहरात स्वत:चे घर नसणाऱ्या नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत. आणखी काही हजार नागरिक अर्ज करण्याची तयारी करत आहेत. महापालिकेने अर्ज करण्यासाठी १६ मेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे मुदतीत अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू आहे.
‘प्रधानमंत्री आवास’ अर्जासाठी मुदत वाढवा
By admin | Published: May 13, 2017 4:45 AM