पुणे : विनामूल्य लसी दाबून ठेवून विकतच्या लसींचा पुरवठा केला जात आहे. व जाहिराती मात्र धन्यवाद मोदी अशा सुरू आहेत. विनामूल्य लशींचा पुरवठा वाढवा अन्यथा जाहिरात फलकांना काळे फासू असा इशारा राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने देण्यात आला.
समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लशींबाबत केंद्र सरकारने सातत्याने धोरण बदलले. लस विनामूल्य देणार असे जाहीर केले. मग विकत देणार असेही सांगितले. आता पुण्यात विनामूल्य लसींचा पुरवठा चारचार दिवस बंद असतो व विकतच्या लशी मात्र खासगी दवाखान्यांना मुबलक दिल्या जातात. त्यामुळे पुण्यात विकत लशी घेतलेल्या नागरीकांचे प्रमाण जास्त असल्याचे तिवारी म्हणाले.
असेच आहे तर जाहिरात फलक तसेच दुरचित्रवाहिन्यांमधून धन्यवाद मोदी अशा जाहिराती केंद्र सरकार कोणत्या तोंडाने करत आहे. असा प्रश्न तिवारी यांनी केला. केंद्र सरकार व भाजपाचे पुण्यातील पदाधिकारी पुणेकरांना वेडे समजत असतील, पण अस्सल पुणेकर भाजपाला याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.