पुणे : शहरातील कमाल तापमानात वाढ झाली असल्याने दुपारच्या वेळी उष्णता जाणवत होती. तर सकाळी आणि सायंकाळी मात्र थंडीने पुणेकर कुडकुडत होते. किमान तापमानाचा पारा १२ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. २५ डिसेंबर मध्य महाराष्ट्र, विदर्भात किंचित तापमानात घट होईल. राज्यात थंडीचा कडाका जरा कमी होत आहे. उत्तर भारतात किमान तापमानात काहीशी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. मात्र आजही अनेक भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या काळात एरवी जाणवत असलेल्या थंडीच्या तुलनेत सध्या गारठा कमी आहे.रत्नागिरीमध्ये सर्वाधिक कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर सर्वात कमी किमान तापमान जळगावात ९.८ अंश सेल्सिअस होते. पुण्यामध्ये किमान तापमान १२.५ होते. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ११ ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड आणि छत्रपती संभाजीनगरला १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पुणे शहरातील किमान तापमान
पाषाण : ११.१हवेली : ११.५
शिवाजीनगर : १२.५कोरेगाव पार्क : १६.७
मगरपट्टा : १७.३वडगावशेरी : १८.६