पुणे : घराबाहेर पडल्यानंतर पुणेकरांना प्रचंड उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दुचाकीवरून जाताना एखाद्या झाडाची सावली आली, तर तिथेच थोडासा थंडावा मिळत असून, उन्हात गेले की, प्रचंड उकाडा जाणवत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारा पाठीवर ओघळत असल्याने हा उन्हाळा नकोसा वाटत आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आणि आता चाळशीवर स्थिरावला आहे.
हवेतील आर्द्रताही कमी झाल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. सध्या शहरात आर्द्रता देखील २५-२६ नोंदवली जात आहे. पुणेकर या उन्हाळ्यात सर्वाधिक हैराण झाल्याचे दिसून येत आहे. असा उन्हाळा कधीच अनुभवला नाही, अशाही प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. किमान तापमानाही चांगलीच वाढ झाल्याने रात्रीही हैराण होऊ लागले आहे.
आता शहरातील किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या वरच नोंदवले जात आहे. जे पूर्वीच्या काळी २० च्या आत नोंदले जायचे. त्यामुळे तापमान अंगाला झोंबत असल्याचा अनुभव मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये दुपारी कडक उन्ह आणि सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे त्या ढगाळ वातावरणाचा काहीसा दिलासा पुणेकरांना मिळू शकतो. परंतु, सध्या तरी पुणेकर घामेघूम होत आहेत.
शहरातील किमान तापमानवडगावशेरी : २५०९मगरपट्टा २५.९कोरेगाव पार्क : २५.५हडपसर २४.७शिवाजीनगर २४.६एनडीए : २१.५