पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-३) बारमध्ये झालेल्या बेकायदेशीर पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन झाल्याप्रकरणी बार मालक-चालक, पार्टीचे आयोजक, डीजे, अमली पदार्थांचे सेवन करणारे आणि पुरवठा करणारे यांच्यासह अन्य आरोपींच्या पोलिस कोठडीत सहा जूनपर्यंत वाढ करण्यात आली.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्याच्या तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पार्टीत ‘एमडी’चे सेवन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तेथे ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आरोपींकडेही एमडी व कोकेन आढळून आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा आणखी तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य केली.