Ajit Pawar | अजित पवार यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 07:06 PM2023-01-07T19:06:23+5:302023-01-07T19:07:26+5:30
...अजित पवार यांनी घेतली पत्रकारांची फिरकी
बारामती (पुणे) : राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यात पोलिस बंदोबस्तात वाढ केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. हिवाळी अधिवेशनात पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचे विधान केले. त्यामुळे राज्यात त्यांच्याविरोधात भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व अन्य काही संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. बारामतीत आंदोलकांनी पोलिसांना गुंगारा देत थेट पवार यांचे सहयोग सोसायटीतील निवासस्थानाबाहेरील प्रवेशद्वाराजवळ त्यांचा पुतळा जाळला. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ७) पवार यांच्या बारामती दौऱ्यात पोलिसांकडून सुरक्षेत अधिक वाढ केल्याचे दिसून आले. जनता दरबारात आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये पत्रकारांनाही प्रवेशद्वाराबाहेर थांबविले.
दरम्यान, बारामतीत अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पवार यांचे जनता दरबारासाठी विद्या प्रतिष्ठान येथे आगमन झाले, यावेळी कार्यकर्त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजीराजे असा फलक झळकवत ‘एकच वादा अजितदादा’, अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी केली.
...अजित पवार यांनी घेतली पत्रकारांची फिरकी
पत्रकारांनी अजित पवार यांना त्यांच्या पोलिस बंदोबस्तात वाढ केल्याचे निदर्शनास आणले. या प्रश्नावर पवार यांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली. पवार म्हणाले, माझ्या बंदोबस्तात का वाढ केली हे मलाही माहिती नाही. यासंबंधी तुम्ही पोलिसांनाच विचारा, कदाचित तुम्ही माझ्यावर हल्ला कराल म्हणून बंदोबस्त वाढवला असेल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. मी बारामतीचा, बारामती माझी, त्यामुळे मी येणार, लोकांच्यात मिसळणार, काम करणार. पोलिसांना एखादा मेसेज मिळाला असेल त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी खबरदारी घेतली असेल, असे अजित पवार म्हणाले.