नीरा (पुणे) : पुरंदर तालुक्यातील नीरा नदीवरील वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने धिम्या गतीने वाढ होत आहे. पाणीसाठा ५९.६२ टक्क्यांपर्यंत पोहाेचला आहे. मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याची माहिती नीरा पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. २.२३ टी.एम.सी. म्हणजे २३.७८ टक्के पाणीसाठा होता. आत मंगळवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणात ५.६० टीएमसी म्हणजे ५९.६२ टक्के पाणीसाठा आहे. काल दिवसभर आणि आज रात्री झालेल्या पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे.
आज मंगळवारी सकाळी वीर धरणातील एकूण पाणीसाठा ५.४१ टीएमसी झाला होता. तर दुपारी चार वाजेपर्यंत ५.६० टी.एम.ची वाढ झाली आहे. रविवारपासून नीरा डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने विसर्ग सुरू होता तो आता वाढवून ८२७ क्युसेक केला असून नीरा उजव्या कालव्यातून ३०० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे दोन्ही कालव्या लगतच्या विहिरींची पाणीपातळी वाढू लागणार आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येणार आहे. या पाण्याचा उपयोग धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतीसाठी होणार आहे. यामुळे वीर धरणाच्या कालव्याच्या पाण्यावर शेती अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे.
नीरा खोऱ्यातील नीरा - देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने संततधार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात धिम्या गतीने का होईना; पण वाढ होत आहे. यावर्षी मान्सून पावसाने नीरा खोऱ्याला हुलकावणी दिली असली तरी मात्र आता उशिरा का होईना पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरुवात केली आहे.
आज मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ३२४ मिमी पावसाची नोंद झाली असून ५५.९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात १,१३० मिमी पावसाची नोंद झाली असून ६९.७५ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात ९९ मिमी पावसाची नोंद झाली असून ५९.६२ टक्के धरण भरले आहे. तर, गुंजवणी धरण क्षेत्रात ७९४ मिमी पावसाची नोंद झाली असून ५९.३७ टक्के धरण भरले आहे. ४८.३२९ टी.एम.सी. पाणीसाठवण क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील या चारही धरणात आज मंगळवारी २९.१२० टी.एम.सी. म्हणजे एकूण क्षमतेच्या ६०.२५ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला या चारही धरणात ३६.१०१ टी.एम.सी. म्हणजे ७४.७० टक्के इतका पाणीसाठा होता.