पुणे : बनावट व्यक्ती, आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमीन व प्लॉट बळकाविल्याच्या गेल्या दीड वर्षात पुणे जिल्हा पोलिसांकडे २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विश्वासघात, फसवणूक केलेल्या संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
शहरालगतच्या जमिनींना मोठा भाव आला आहे. शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीलगतच्या जमिनीबाबत अनेक गैरप्रकार होत असल्याचे आढळून आले आहेत.
अनेकदा मुंबई, ठाणे, पुणे शहरातील व्यावसायिक, उच्चवर्गीय गुंतवणूक म्हणून ग्रामीण भागातील शेतजमीन, प्लॉट खरेदी करतात. अनेकदा केवळ साठेखत केले जाते. शहरातून ग्रामीण भागात नियमित जाणे शक्य नसल्याने त्यांचे दुर्लक्ष होते. त्याचा गैरफायदा घेऊन भूमाफिया बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्या व्यक्तीला उभे करून जमिनींचे परस्पर व्यवहार करून जागा बळकावितात. काही प्रकरणात शेतकऱ्यांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली जाते. मग एकाला साठेखताद्वारे विक्री केल्यानंतर ती जमीन दुसऱ्याला विकली जाते. काही प्रकरणात मूळ मालकाचे नातू व इतरांना पुढे करून त्यांच्याकडून पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेऊन त्याचे प्लॉट पाडण्याच्या नावाखाली जमिनीवर लेटिगेशन निर्माण केले जाते. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीनमालकाला त्रास दिला जातो. महसूल विभागात अशी प्रकरणे वर्षानुवर्षे पडून राहतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी जमीनमालकाकडून खंडणी वसूल केली जाते.
काही प्रकरणात मृत व्यक्तीच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून कागदपत्रांवरील फोटो बदलून जमिनीची खरेदी विक्री केली जाते.
जमिनीच्या फसवणूक प्रकरणात होतेय वाढ
पुणे जिल्ह्यात २०२० मध्ये जमिनीची खरेदी-विक्री करून फसवणूक केल्याचे १३ गुन्हे दाखल होते. गेल्या पाच महिन्यांत असे तब्बल १० गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्हा पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडून अशा गुन्ह्यांचा तपास केला जात असून कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येते.
जिल्ह्यात लँड डिस्प्युटस सेल नाही
पुणे जिल्ह्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. फसवणुकीच्या एकूण गुन्ह्यांच्या प्रमाणात जमीन व प्लॉटमधील फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे प्लॉट व जमीन हडपल्याच्या तक्रारीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र लँड डिस्प्युटस सेल नाही. आर्थिक गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातून अशा गुन्ह्यांचा तपास केला जातो. पुणे शहरालगतच्या परिसरात तसेच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात अशा गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. पुणे शहरात गेल्या अडीच वर्षांत असे ७७ गुन्हे दाखल झाले आहेत.