निनाद देशमुख।
पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेला १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवून ३ मेपर्यंत केला आहे; मात्र देशातील वैद्यकीय संसाधने बघता लॉकडाऊन ३० जूनपर्य$ंत वाढवावा; तसेच देशातील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात यावी, असा निष्कर्ष पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील ‘आएएनएस अश्विनी’ या नौदलाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून काढला आहे.
देशात ‘कोव्हिड-१९’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील अनेक संस्था ‘कोरोना’वर लस शोधत आहेत. या समस्येचा सामना कसा करावा आणि त्यावर काय उपाय योजावे, यावर पुण्यातील लष्करी महाविद्यालय आणि मुंबईतील ‘आयएनएस अश्विनी’ या नौदलाच्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे ‘मॅथेमॅटिक्स मॉडेलिंग आॅफ पोस्ट लॉकडाऊन’ हा संयुक्त अभ्यास करण्यात आला. ‘आयएनएस अश्विनी’तर्फे डॉ. कौस्तुक चॅटर्जी, तर एएफएमसीतर्फे डॉ. कौशिक चॅटर्जी, डॉ. अरुण यादव आणि डॉ. शंकर सुब्रह्मण्यम यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासानुसार सध्याची परिस्थिती पाहता आता असलेला लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्याची गरज आहे. जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही व त्यावर योग्य लस उपलब्ध न झाल्यास हा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढविणे अनिवार्य असल्याचेही यात नमूद केले.
देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की, राज्यात प्रति एक हजार व्यक्तीमागे केवळ १८४ रुग्णभरती क्षमता आहे. तर, ७० आयसीयू उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर वैद्यकीय संसाधनांची संख्याही अतिशय कमी आहे. त्यामुळे कमीत कमी नागरिक या आजाराने बाधित होतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या या औषधाची कोणतीही लस उपलब्ध नसल्याने, संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन कालावधी ३० जूनपर्यंत वाढविणे गरजेचे आहे.देशात केवळ १ लाख व्हेंटिलेटरभारतात सुमारे ३६ कोटी ४० लाख नागरिक बाधित होऊ शकतात. हा आकडा बघता ३१ लाख २० हजार व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. भारतात १५ लाखांपर्यंत मृत्यू होऊ शकतात, यातील ८० टक्के मृत्यू हे वृद्धांचे होतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात केवळ १ लाख व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. येत्या काळात ही संख्या वाढवावी लागणार आहे.