लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने, पुणे महापालिका सर्वांच्या सहकार्याने विविध पातळीवर उपाययोजना राबवत आहे. मात्र संसर्गाची व्याप्ती पाहता ससून रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या उपचारसाठीच्या बेडची संख्या लवकरात लवकर वाढवावी़, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, ससूनमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढविण्याबाबतही त्यांनी मागणी केली आहे़
महापौर मोहोळ यांनी गुरूवारी याबाबतचे पत्र वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे़ महापौर म्हणाले की, महापालिका जास्तीत जास्त चाचण्या करणे, शहरामध्ये आॅक्सिजन बेडस, आयसीयू बेडस उपलब्ध करणे, लसीकरण वेगाने करणे अशा स्वरूपाचे काम युद्धपातळीवर करत आहोत. मात्र शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता त्या प्रमाणात बेडसची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. महापालिकेच्या स्तरावर आमची सर्व रूग्णालये आज पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शिवाय खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के बेड्स ताब्यात घेण्यात आले आहेत. तथापि ससून रुग्णालयातील बेडसची क्षमता १,७५० असूनही, त्या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी केवळ ५०० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ सध्या ससूनमधील ६० टक्के बेडस कोरोना रुग्णांसाठी राखीव केले, तरी येथे बेडसची संख्या १ हजार ५० इतकी होऊ शकते. त्यामुळे शहराची कोरोनाची एकूण स्थिती पाहता आपण त्वरित अशा प्रकारे आदेश द्यावेत ही विनंती पत्राद्वारे केली आहे़
आज दररोज २५,००० ते ३०,००० चाचण्या शहरात होत आहेत़ परंतु यातील फक्त ३,००० चाचण्यांची तपासणी ससूनमधील सरकारी लॅबमध्ये केली जातात. उर्वरित चाचण्यांची तपासणी खासगी लॅबमार्फत केली जात आहे. म्हणजेच जवळपास २०,००० पेक्षा जास्त नागरिक जे खाजगी लॅबमध्ये चाचण्या करतात, त्यांचे रिपोर्ट तीन ते चार दिवस विलंबाने येत असल्याने त्यांच्यामार्फत शहरात संसर्ग वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणूनच किमान १०,००० चाचण्यांची तपासणी या ठिकाणी होणे आवश्यक आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
--------------------------------