पुणे : रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाही. सातत्याने तिकीट तपासणी मोहिम राबवूनही रेल्वे प्रशासनाला विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवता आलेला नाही. या मोहिमेअंतर्गत मागील पाच महिन्यांत पुणे विभागात तब्बल ६४ हजार १३९ फुकटे प्रवासी सापडले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या संख्येत वाढ झाली आहे.
फुकटे प्रवासी रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर काही प्रवासी अर्ध्या प्रवासाचे तिकीट काढून पुढील स्थानकांपर्यंत त्याच तिकीटावर प्रवास करतात. रेल्वेकडून अवघड सामानासाठीही तिकीट घेतले जाते. पण अनेक प्रवासी सामानाचे तिकीट घेत नाहीत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून अशा सर्व प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशांना तुरूंगाचीही हवा खावी लागते. रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहिम राबविली जाते. पण त्यानंतरही फुटक्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात पुणे-मुळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर मार्गावर ही मोहिम राबविली जात आहे. या मार्गांवर एप्रिल ते आॅगस्ट महिन्यात केलेल्या तिकीट तपासणीत ६४ हजार १३९ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३ कोटी ५४ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच या मोहिम विना तिकीट प्रवाशांसह अन्य प्रकरणांमध्ये १ लाख ४० हजार ३७१ जणांवर कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत एकुण ६ कोटी ७७ लाख रुपये दंडाची वसुली करण्यातआली.
मागील वर्षी याच कालावधीत एकुण १ लाख १३ हजार ९७७ जणांना ६ कोटी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तिकीट तपासणी मोहिम यापुढेही सुरू राहणार असून प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.