लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात बहुतांश मनोरुग्णांना जिल्हा रुग्णालयांमधील मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेण्यास सुचवले होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेकांनी रुग्णांना घराबाहेर नेले नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. सध्या स्किझोफ्रिनिया, डिप्रेशन अशा विविध आजारांसाठी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात १०५० रुग्ण उपचार घेत आहेत. डिप्रेशन, फोबिया, मॅनिया, स्किझोफ्रिनिया या मानसिक आजारांचे प्रमाण गेल्या काही काळात वाढले आहे.
मनोरुग्णालयातून बरे झालेल्या मात्र उपचार सुरू असलेल्या रुग्णांना कोरोनाचा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांच्या काळात उपचारांसाठी घराबाहेर पडता न आल्याने पुन्हा रुग्णालयात भरती करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णांना डॉक्टरांनी फोनवरून सल्ला देण्याचे, उपचार सुचविण्याचे काम केले. काहींना जिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात आले. मात्र, बहुतांशी रुग्ण लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडले नाहीत. कोरोनाच्या काळात सामान्यांमध्येही नैैराश्य, भीती, कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आयसोलेशनमुळे आलेला एकलकोंडेपणा वाढीस लागला. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडे नियमित उपचारांसाठी येणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले.
कोरोनाच्या काळात रुग्णालयांतील कर्मचा-यांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या निम्म्यावर आली होती. रुग्णांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले जात होते, समुपदेशन केले जात होते. त्यामुळे लॉकडाऊननंतर रुग्णांची संख्या पूर्ववत होत आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी म्हणाल्या, ‘क्रॉनिक रुग्णांना लॉकडाऊनचा काळ काहीसा अवघड गेला. मात्र, लॉकडाऊनमध्ये पुणे शहरातील किंवा आसपासच्या परिसरातील लोक लॉकडाऊन या काळातही रुग्णांना उपचारांसाठी घेऊन येत होते. ज्यांना पुण्यात येणे शक्य नव्हते त्यांनी जिल्हा रुग्णालयांमधील मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधला आणि औैषधोपचार घेतले. औैषधांमध्ये खंड पडू न देण्यास सांगण्यात आले होते. कोरोनाची माहिती रुग्णांना विविध माध्यमांतून मिळत होती. त्यामुळे स्वत:ची काळजी कशी घ्यायची, हे त्यांना समजावून सांगितले गेले. नातेवाईकांनी रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली.’
----------------------
कोरोना काळात प्रत्येक वॉर्डमध्ये कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत होते. रुग्णांना मास्क, सॅनिटायझर, आॅक्सिजन लेव्हल यावर लक्ष ठेवण्यात येत होते. संपूर्ण काळजी घेतल्यामुळे केवळ ७ रुग्णांनाच कोरोनाची बाधा झाली. सर्व रुग्णांची नियमित तपासणी करण्यात येत होती.
- डॉ. अभिजित फडणीस, मनोरुग्णालय अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय
----------------------
येरवडा रुग्णालयाची क्षमता : २५४०
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १०५०
बाह्य रुग्ण विभागातील संख्या : १५०-२००