लोणी काळभोर: हवेली तालुका पुरवठा विभागातील ग्रामीण भागांर्तगत येणा-या गावांसाठी फक्त आठ शिवभोजन थाळी केंद्र आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ती कमी पडत असल्याने या केंद्राची व्याप्ती वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कदमवाकवस्ती येथील जय भवानी बहुउद्देशीय सेवा मंडल व प्रतिक गार्डन मंगल कार्यालय, वाघोली येथील हॉटेल कांचन, पेरणे येथील संघर्ष महिला बचत गट, उरुळी देवाची येथील स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, फुरसुंगी येथील व्यंकटेश्वरा मेस सर्व्हिसेस, जांभुळवाडी येथील स्वरांगी महिला बचत गट व पिसोळी येथील कृष्टरोग शिवभोजन केंद्र अशी हवेली तालुका पुरवठा विभागात मान्यताप्राप्त फक्त आठ शिवभोजन थाळी केंद्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुमारे ८० महसूली गावांचा भार फक्त या ८ शिवभोजन थाळी केंद्रावर असल्याने येथे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी गरीब व गरजू लोकांकडून होऊ लागली आहे.
सध्या राज्यात लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर एका महिना गरीब आणि गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या थाळीमध्ये दोन चपाती, भाजी, एक वाटी डाळ आणि भात यांचा समावेश असेल. राज्यात रोज ९६४ केंद्रावरून २ लाख शिवभोजन थाळींचे वितरण राज्यात करणार असल्याचे जाहीर झाल्यापासून लोक ९६४ शिव भोजन थाळी देणाऱ्या केंद्राची यादीची मागणी करत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या मागणीनुसार, हवेलीतील पुरवठा विभागाने शिवभोजन थाळी देणाऱ्या आठ केंद्राची यादी दिली आहे.