पुणे : संपूर्ण राज्यातून आषाढी वारीसाठी जवळपास १२ लाख भाविक सहभागी झाले हाेते. आता आषाढी झाल्यावर भाविक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, पंढरपुरात वारीमध्ये माेठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्याने आता महाराष्ट्रात काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
या आषाढी वारीत आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर या दरम्यान लाखाे वारकरी असतात. ते वारकरी पायी प्रवास करतात. यंदा २० जून ते १० जुलै या तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला. काेराेना प्रादुर्भावातून घातलेल्या निर्बंधामुळे दोन वर्षे वारीच झाली नाही, मात्र त्यानंतर यंदा झालेली वारी ही कोणत्याही निर्बंधांशिवाय आणि सुरक्षेच्या नियमांशिवाय झाली आहे. त्यातच रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
जिल्ह्यांना दिल्या या सूचना...
- तीव्र ताप आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (सर्दी) पसरू नये यावर लक्ष ठेवा
- स्थानिक गरजेनुसार चाचण्यांची संख्या वाढवा
- सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवा
- स्थानिक रुग्णवाढीकडे लक्ष द्या. एखाद्या भागात माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाला कळवावे.
आषाढी वारीतील यात्रेकरू त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर काेरोनाची थाेडी रुग्णवाढ हाेण्याची शक्यता आहे. खासकरून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही संख्या वाढली तरी येत्या दहा-पंधरा दिवसांत रुग्ण संख्या वाढून परत पूर्वस्थिती येईल.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, पुणे