पुणे : लॉटरी लागली, नोकरीचे आमिष दाखविणे, डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून आॅनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांची फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.येरवडा भागातील ५० वर्षांच्या महिलेला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून ३३ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून एकाने लॉटरी लागल्याचे आमिष तिला दाखविले होते. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्याची सूचना करण्यात आली होती. महिलेने वेळोवेळी ३३ हजार रुपये बँक खात्यात जमा केले होते. महिलेने त्या क्रमांकावर संपर्क साधला तो तेव्हा बंद असल्याचे निदर्शनास आले.एका युवतीच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती चोरून तिच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. युवतीने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. युवतीच्या डेबिट कार्डची माहिती चोरून लष्कर भागातील एका बँकेतून बनावट डेबिट कार्डचा वापर करुन खात्यातून रोकड काढण्यात आली.संकेतस्थळ विक्री करण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अकिल पटेल (वय ३७, रा. कडनगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पटेल यांच्या मोबाइलवर संपर्क साधून एकाने संकेतस्थळ विक्रीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर पटेल यांना त्याने पेटीएममध्ये १२ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. पटेल यांनी पैसे जमा केले; मात्र कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यात आला नाही.४एका महिलेला बक्षीस देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. एका योजनेत विजेत्या ठरल्याचे आमिष एकाने दाखविले होते. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला बक्षिसापोटी दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, फ्रिज देण्याचे आमिष दाखवून तिला पेटीएममध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. महिलेकडून ४१ हजार ९८७ रुपये उकळण्यात आले; मात्र तिला बक्षीस देण्यात आले नाही.
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत वाढ; एका दिवसात चार गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 3:10 AM