लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला कथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ राजाराम येमूल (४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणात चेन्नई येथील आर. सी. बेसल व शहरातील जॉन या ज्योतिषांचीही नावे समोर आली आहेत. याकडे पीडितेच्या पतीने भविष्याबाबत विचारणा केली. या ज्योतिषांनी त्यांच्याकडे चांगली व वाईट वेळ याबाबत सल्ला दिल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी न्यायालयाला दिली.
आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने येमूलला सोमवारी (दि. १२) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. संबंधित गुन्हा हा गंभीर आहे. येमूल हा तपासास सहकार्य करीत नाही. त्याने आरोपींच्या संगनमताने संसार मोडण्यासाठी कट केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिचा पती येमूलच्या संपर्कात होता. तसेच ते दोघेही तिरूपती बालाजी याठिकाणी सोबत असल्याचे छायाचित्र उपलब्ध आहे. त्यामुळे, पीडितेचा पती कोठे आहे याबाबतची माहिती आरोपीला असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी येमूलच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. मुरळीकर यांनी न्यायालयाला केली.
चौकट
सुनेला सिगारेटचे चटके, मारहाण
उच्चशिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देत, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६) व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना तात्पुरता अटकपूर्व जामीन झाला असून, पती गणेश आणि राजू अंकुश हे फरार आहेत. याबाबत २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.