बारामती : दिवाळीमध्ये बच्चे कंपनीचे विश्व म्हणजे किल्ला. पहिल्या सत्रातील परीक्षा संपल्या, की किल्ला बनवण्यासाठी चिमुरड्यांची लगबग सुरू होते. बाजारामध्ये पीओपीचे मिळणारे तयार किल्ले फ्लॅटसंस्कृतीच्या बालकनीत सजतात. मात्र, ग्रामीण भागात घरातील अंगणात दगड-मातीपासून हवा तसा किल्ला बनवताना चिमुरडे दिसत आहेत. तसेच बाजारातील तयार किल्ल्यांनाही शहरी भागात मागणी आहे. मात्र, मागील वर्षीपेक्षा यंदा किल्ल्यांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किल्ला बाजारातील असो अथवा दगड-मातीपासून बनवलेला असो, तो सजवण्यासाठी मातीच्या चित्रांची खरेदी ओघाने आलीच. दिवाळीनिमित्त कुंभार समाजाबांधव लक्ष्मीपूजनासाठी बोळकी, पणती, मातीचे चित्रे बनवण्यात सध्या व्यस्त आहेत. पीओपीच्या मातीच्या चित्रांना आकर्षक रंगामुळे जास्त मागणी आहे. होलसेलमध्ये एक मातीचे चित्र ६ रुपयांना, तर बाजारामध्ये सुमारे १२ रुपयांना एक याप्रमाणे विक्री होत आहे. तर, तयार किल्ले २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत होलसेलमध्ये विक्री केले जात आहेत. पीओपींच्या चित्रांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती गुणवडी येथील शरद कुंभार यांनी दिली. मागील काही वर्षांपासून बाजारामध्ये पीओपीचे तयार किल्ले मिळू लागले आहेत. आकर्षक रंग, बुरूज-कमानींची मांडणी यामुळे या किल्ल्यांनाही बालचमूंकडून पसंती मिळते. तर, शहरातील फ्लॅटसंस्कृतीमध्ये दगड-मातीपासून किल्ले बनवणे तसे मुश्कीलच. याला पर्याय म्हणून बाजारात मिळणारे तयार किल्ले आणून घरासमोर किंवा अगदी घरातदेखील मांडले जातात. याउलट परिस्थिती ग्रामीण भागात पाहायला मिळते. परीक्षा झाल्या रे झाल्या की लहानग्या मावळ्यांची फौज सायकल, मोकळी पोती घेऊन किल्ल्यासाठी योग्य माती शोधण्यासाठी निघते. चार-दोन सवंगडी मिळून घरटी किल्ला बनवण्यासाठी दिवसभर माती आणतात. त्यानंतर सुरू होते प्रत्येकाच्या घरी किल्ला बनवण्याची धामधूम. (प्रतिनिधी)
पीओपीचे दर वाढल्याने किल्ल्यांच्या किमतीत वाढ
By admin | Published: October 24, 2016 1:17 AM