पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी फळभाज्या व पालेभाज्यांची चांगली आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भेंडी, वांगी, टोमॅटो आणि कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली. वांग्याच्या दरात क्विंटलमागे सुमारे ९०० रुपयांनी वाढ झाली असून, कांदा व हिरव्या मिरचीच्या दरात घट झाली आहे.
मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने वांग्याला चांगला भाव मिळाला. मागील आठवड्यात वांग्याला ६०० ते १६०० रुपये दर मिळाला होता. आता क्विंटलला ६०० ते २५०० रुपये दर मिळत आहे. कोथिंबीर व मेथीच्या दरातही वाढ झाली असून, गेल्या आठवड्यात कोथिंबिरीला शेकडा गड्डीसाठी ३०० ते ८०० रुपये जुडी दर मिळाला. मात्र, मंगळवारी कोथिंबिरीला ५०० ते १२०० रुपये तर मेथीला ४०० ते ८०० रुपये दर मिळाला. कांद्याच्या दरात घसरण कायम असून, कांद्याला ३०० ते ११०० रुपये तर हिरव्या मिरचीला १००० ते १८०० रुपये दर मिळाला.