लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे मानसिक, आर्थिक स्वास्थ्य बिघडल्याने आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली असून, २०१९ पेक्षा २०२० मध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी २०२१ मधील पहिल्या ४ महिन्यांमध्ये तुलनेने आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत.
लॉकडाऊन आणि कोरोनाचा काळ असा स्वतंत्र विचार केला तर पूर्ण लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरातील आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी २०१९ आणि २०२० वर्षाची तुलना केली असता कोरोनाच्या २०२० वर्षांमध्ये ४७ आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्याच वेळी मार्च ते जुलै या २०२० मधील संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरात २६४ आत्महत्या घडल्या होत्या. त्याच वेळी मार्च ते जुलै २०१९ मध्ये त्यापेक्षा अधिक ३०५ आत्महत्या झाल्या होत्या.
आत्महत्यांच्या कारणामागे प्रामुख्याने घरगुती वाद, प्रेमप्रकरण, मानसिक नैराश्य ही तीन प्रमुख कारणे असल्याचे दिसून येतात.
संपूर्ण लॉकडाऊनच्या मार्च ते जुलै या काळात पुणे शहरात झालेल्या आत्महत्येचा तुलनात्मक अभ्यास गतवर्षी एसएनडीटी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या माधवी कुलकर्णी, सहयोग प्रा. वासंती जोशी आणि मानसी राजहंस यांनी केला होता. त्यानुसार २०१९ पेक्षा २०२० मध्ये ४१ आत्महत्या कमी झाल्या.
२०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या - ६२४
२०२० मध्ये झालेल्या आत्महत्या - ६७१
२०२१ मध्ये झालेल्या आत्महत्या - २२२
कोविड १९ ची भीती इतकी होती की, त्याच्यापुढे सर्व समस्या कमी वाटण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असावे. त्याच वेळी या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडायला बंदी असल्याने घरातील सर्व जण एकत्र असल्याने त्याचा परिणाम म्हणूनही आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याची शक्यता आहे.
मात्र, त्यानंतर अनलॉकमध्ये पुन्हा आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे वर्षाअखेरीस दिसून आले आहे. व्यवसायातील वाढत्या समस्या, कर्जबाजारीपणा, नोकरीची भीती, प्रेमास नकार, कौटुंबिक समस्या यामुळे अनलॉकमध्ये आत्महत्या वाढल्याचे दिसून आले आहे.
कोरोनामुळे ८ जणांच्या आत्महत्या
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आतापर्यंत ८ जणांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्यात ५ पुरुष आणि ३ स्त्रियांचा समावेश आहे. त्यापैकी ६ आत्महत्या २०२० मध्ये झाल्या असून, २०२१ मध्ये २ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
.........
कालावधीएकूण आत्महत्या पुरुष स्त्री
२०१९ ६२४ ४३८ १८६
२०२० ६७१ ५००. १६५
२०२१ २२२ १५९. ६३