भवानीनगर : कारखान्याच्या सहवीजनिर्मिती व विस्तारवाढ प्रकल्पातील खर्च अनाठायी वाढला आहे. त्यामुळे सहवीजनिर्मिती प्रकल्प तोट्यात आहे. कारखान्यावर ३०० ते ३२५ कोटी कर्जाचा बोजा आहे. प्रकल्प न परवडणारा आहे, बगॅस जाळण्यापेक्षा तो विकल्यास जादा पैसे कारखान्याला मिळतील, असे राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.
रविवारी (दि. ३०) भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले. या वेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष घोलप म्हणाले, ‘गतवर्षी कारखान्याचा विस्तारवाढ प्रकल्प व सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू होऊन गळीत हंगाम पार पडला. या हंगामात मोठे आव्हान असताना ८ लाख १३ हजार ६०६ मे. टन उसाचे गाळप केले. सहवीजनिर्मिती प्रकल्पामध्ये ३ कोटी १८ लाख ६१ हजार युनिट वीजनिर्मिती केली. प्रति युनिट ६ रुपये ३३ पैसे दराने महावितरणला वीजविक्री केली. आगामी हंगामात ११ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी २०१८-१९ च्या गाळप हंगामातील कारखान्याची एफआरपी प्रती टन २४९८.३६ बसत आहे. यावर्षी साखरेचे दर घसरल्याने कारखान्याला ७५ ते ८० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. पुढील २ ते ३ वर्षे साखर उद्योगापुढे मोठे आव्हान आहे. इथनॉलचे दर चांगले आहेत. शासनाने प्रोत्साहन दिल्यास इथेनॉल प्रकल्पाकडे वळणे गरजेचे आहे.कार्यकारी संचालक जी.एम. अनारसे यांनी विषय वाचन केले. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष जाचक म्हणाले, ‘कारखान्याच्या आॅनलाईन खरेदीचे पासवर्ड अध्यक्ष व कार्यकारी संचालकांऐवजी सर्वांकडे आहेत, हा गंभीर प्रकार आहे. भाऊसाहेब सपकाळ यांनी हुमणीग्रस्त शेतकऱ्यांच्या ऊसतोडीला प्राधान्य द्यावे. तसेच सभासदांचा आरोग्य विमा कारखान्याने काढावा, अशी मागणी केली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी भवानीनगरमध्ये राजमाता जिजाऊ व संभाजी महाराज यांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली. बाळासाहेब कोळेकर यांनी आॅडिटरने कारखान्यावर ३०७ कोटी कर्ज दाखविले असल्याचा आरोप केला. सतीश काटे यांनी कारखान्यातील स्पेअर पार्ट अवास्तव दराने खरेदी केली जात असल्याचा आरोप केला.रामचंद्र निंबाळकर, मुरलीधर निंबाळकर, पांडुरंग रायते, अॅड. संभाजी काटे, राजाराम रायते, देवेंद्र बनकर, दत्तु जामदार, आप्पा भिसे, युवराज म्हस्के, सुभाष ठोंबरे, शंकरराव रूपनवर आदींनी विविध सूचना मांडल्या. अध्यक्ष घोलप यांनी सूचनांची नोंद घेत कार्यवाही करण्याचेआश्वासन दिले. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष मारूतराव चोपडे, विश्वनाथ गावडे, संचालक रणजित निंबाळकर आदी उपस्थित होते.काही काळ गोंधळाचे वातावरणकारखान्याचे तज्ज्ञ संचालक तानाजी थोरात यांनी कारखान्याच्या मुलाखती झालेल्या कामगारांची यादी अजित पवारांकडे गेलीच कशी असा सवाल केला. यावर अध्यक्ष घोलप यांनी अजित पवार आमचे नेते आहेत, कामगार निवडीत पारदर्शकता यावी, यासाठी ती यादी त्यांच्याकडे गेली, असा खुलासा के ला. यावर थोरात यांनी पवार यांचा काय संबंध? असा पुन्हा सवाल केला. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी थोरात यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ गदारोळ निर्माण झाला. काही वेळानंतर सभा सुरळीत सुरू झाली.