डमी स्टार ९००
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर औंध जिल्हा रुग्णालयात हाडांच्या शस्त्रक्रिया तसेच पोटाशी संबंधित शस्त्रक्रियांचे प्रमाण आता पूर्ववत होत आहे. प्रसुती शस्त्रक्रिया कोरोना काळातही सुरुच ठेवण्यात आल्या होत्या. नेत्रशस्त्रक्रिया मात्र अद्याप सुरु झालेल्या नाहीत. बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात तातडीच्या शस्त्रक्रिया सुरु ठेवण्यात आल्या होत्या. नियोजित शस्त्रक्रिया पूर्ववत झाल्या आहेत.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पहिली लाट आली आणि कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या तीन महिन्यांच्या काळात रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाली. मार्चमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आणि एप्रिल-मेमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला असताना शासकीय रुग्णालयांमधील इतर विभागांमध्येही कोरोना रुग्णांच्या उपचारांची सोय करण्यात आली. मर्यादित मनुष्यबळाप्रमाणे तातडीच्या वगळता इतर शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पूर्ववत होत आहे.
औंध जिल्हा रुग्णालयात २०१९-२० या वर्षात २६८५ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०२०-२०२१ या काळात केवळ २१८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मंचर उपजिल्हा रुग्णालयात २०१९-२० या काळात ५९८, तर २०२०-२१ या काळात एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ३००-३५० इतकी होती. आता दररोज ८५०-९०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात दाखल होत आहेत.
चौकट
महिना हाडांच्या शस्त्रक्रियास्त्रीरोग शस्त्रक्रियासामान्य शस्त्रक्रिया
मार्च ३३ ४९ ११
एप्रिल १७ ३१ ०१
मे ४ ५१ -
जून १६ ३८ -
जुलैै ९ १६ ०१
----------------------------------------------------------
एकूण ७९ १८५ १३
चौकट
“कोरोना काळात प्रसूती आणि स्त्रीरोग शस्त्रक्रिया सुरुच ठेवण्यात आल्या होत्या. केवळ हाडांशी संबंधित तसेच सामान्य शस्त्रक्रिया दीड महिना बंद होत्या. नियोजित आणि लांबणीवर पडलेल्या शस्त्रक्रिया आता सुरु करण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची संख्या पूर्ववत होत आहे.”
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक