पुणे : कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी दोन दोन तास ताटकळत राहावे लागत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे मृतदेह एका स्मशानभूमीतून दुसऱ्या स्मशानभूमीत हलविण्यास सांगण्याच्या आणि अंत्यविधीसाठी पैसे मागण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे अंत्यविधींसाठी स्मशानभूमींची संख्या वाढविण्यात आली असून रुग्णालयांनुसार स्मशानभूमींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक स्मशानभूमीसाठी शववाहिकाही तैनात करण्यात आली आहे.यापुर्वी कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच कोरोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार केले जात होते. यापुढे या दोन स्मशानभूमींसह औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी स्मशानभूमीमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कैलास आणि येरवडा स्मशानभूमीमध्ये 24 तास अंत्यविधी केले जाऊ शकणार आहेत. तर, उर्वरीत स्मशानभूमींमध्ये सकाळी 8 ते रात्री 12 या वेळेतच अंत्यसंस्कार होणार आहेत. यासोबतच कोरोनाव्यतिरीक्त अन्य मृतांचेही अंत्यसंस्कार पुर्वीप्रमाणेच 24 तास सुरु राहणार आहेत.कैलास स्मशानभूमीत पुष्पकसह दोन शववाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली असून ठरवून दिलेल्या रुग्णालयातील मृतदेह आणण्याची जबाबदारी चालकावर देण्यात आली आहे. मृतदेहासाठी रुग्णवाहिका बोलाविताना मृताचे नाव, डॉक्टरचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच शितशवपेटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरचा कोविड क्रिमेशन हा व्हॉट्सअॅप ग्रृप करण्यात आला असून या गृपवर मृताची माहिती टाकण्यात येणार आहे. कागदपत्रांची पुर्तता करुन ऑनलाईन पद्धतीने मयत पास घेतल्यावर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच घरामध्ये मृत्यू झालेला असल्यास नातेवाईकांनी क्षेत्रीय वैद्यकीय अधिका-यांना माहिती देणे, ऑनलाईन पाससाठी अर्ज करणे, मयत पास घेऊन पुढील प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना संपर्क करुन त्यांना पीपीई कीट व शव बॅग उपलब्ध करुन द्याव्यात. मृत व्यक्तीच्या घरासह आजुबाजुच्या परिसरात निर्जंतुकीकरण करणे, कोविडमुळेच मृत्यू झाला आहे का याची खात्री करणे अशा सूचना विद्यूत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिल्या आहेत.