पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यकक्षेतील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. येत्या १६ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रियेस सुमारे दोन ते तीन महिने लागणार आहेत. कोरोनाकाळात विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीनेच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे यंदा कनिष्ठ महाविद्यालयांनाच प्रवेश देण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी काही प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवेश लवकर झाले तर विद्यार्थ्यांचे वर्गही लवकर सुरू होतील. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत वेळ घालू नये, अशी अपेक्षा संस्थाचालक व प्राचार्यांकडून व्यक्त केली जात असली तरी प्रवेश प्रकियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीनेच प्रवेश द्यावेत, अशी काही विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. परंतु,अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. एकूण परिस्थितीवरून कटऑफ वाढणार असल्याने ७० ते ७५ टक्के गुण मिळूनही या विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
--------------------------
गेल्या वर्षी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे ३५ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, त्यातील बहुतांश सर्व जागा या विनाअनुदानित तुकड्यांच्या होत्या. विनाअनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जास्त शुल्क द्यावे लागले. परिणामी अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी सर्वच प्रयत्न करतात. परंतु, बहुतांश सर्वच अनुदानित तुकड्यांसाठीचा कटऑफ ८० ते ९० टक्क्यांच्या पुढे असतो. त्यामुळे कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक शुल्क मोजावे लागणार आहे.
---------------------
गेल्या काही वर्षांपासून पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविली जाणारी यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत. मात्र, निकाल वाढल्याने कट ऑफ वाढणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा विचार करून प्रवेश अर्जात पसंतीक्रम भरावे लागणार आहे.
- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड
-------------------------------------
ग्रामीण भागात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ अकरावी प्रवेश सुरू होता. त्यानंतर आठवड्याभरात अकरावीचे वर्ग सुरू होतात. ऑनलाईन प्रक्रियेत दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे उशिरा वर्ग सुरू होतात. विद्यार्थी शैक्षणिक हिताचा विचार करून महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने प्रवेश देण्याचे अधिकार देणे उचित होईल.
-अशोक मुंढे, उपप्राचार्य, वाडिया,कॉलेज
--------
नववीत कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सीईटी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवता आले असते. त्याआधारे त्यांना आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला असता. मात्र, सीईटी रद्द झाल्याने आम्ही विद्यार्थी चिंतेत आहोत.
- ऐश्वर्या विश्वकर्मा, विद्यार्थी