लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जीएसटी लागू होण्यापूर्वीच त्याचा नागरिकांनी धसका घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसाला साधारणपणे दहा हजारांच्यावर दस्तांची नोंदणी होत असून जवळपास दोनशे कोटींच्या पुढे दिवसाला वसुली होत असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून उपलब्ध झाली आहे.मागील तीन दिवसांपासून घर खरेदी करण्यासाठी नागरिकांमधून प्रतिसाद मिळत असून असून दस्त नोंदणीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. राज्यामध्येही सर्वत्र हेच चित्र होते. जीएसटीच्या करप्रणालीमध्ये घर खरेदीवर बारा टक्के कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे घरे महागणार असल्याचे बोलले जात आहे. घरे महागण्यापूर्वीच गृहखरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेकांची धावपळ उडालेली होती. गेल्या तीन दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती.बाजारातील मंदीमुळे गृहखरेदी मंदावली होती. बांधकाम व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत होता. मात्र, जीएसटीच्या पार्श्वभूमीवर दस्त नोंदणीमध्ये झालेली वाढ काही प्रमाणात व्यावसायिकांना दिलासा देणारी आहे. राज्यभरात दिवसाला साधारणपणे आठ ते साडेआठ हजार दस्तांची नोंदणी होत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांत दहा हजारांपेक्षा अधिक दस्तांची दर दिवसाला नोंदणी होत आहे. विशेष म्हणजे मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून दिवसाला ७० ते ८० कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत होता. हे प्रमाणही वाढले असून २०० कोटी रुपयांचा महसूल दररोज शासनाच्या तिजोरीत मागील तीन दिवसांपासून जमा होत असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मिळाली आहे.
जीएसटीच्या धसक्याने वाढली दस्तनोंदणी
By admin | Published: July 01, 2017 8:02 AM