पुणे : घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असलेल्या वाऱ्यामुळे संपूर्ण भारतात उष्णतेची लाट आली होती. तिचा परिणाम आता कमी होत असल्याने अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त हवेमुळे कोकणात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. पुण्यात ३९ अंशांपर्यंत कमाल तापमान गेले असताना रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. त्यामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली असली तरी रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाली असल्याने उकाडा वाढला आहे.
पुणे शहरात रविवारी कमाल तापमान ३७.८ अंश, तर किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान सरासरीच्या १.५ अंशाने अधिक होते. त्याच वेळी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ५.२ अशांनी वाढ झाली होती.
मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान शनिवारी १९ मार्च रोजी ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. कमाल तापमानात घट झाली. त्याच वेळी शनिवारी १८.७ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान रविवारी सकाळी २१.७ अंश सेल्सिअसवर गेले होते.
पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमान ३८ व २१ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण भारतात उष्णतेच्या लाटेचे श्रेय ५०० एमबी स्तरावर बसलेले मजबूत अँटीसायक्लोन हे असू शकते, जे पृष्ठभागापर्यंत पसरत आहे आणि हवेला खालच्या दिशेने ढकलत आहे.
जसजशी हवा खाली जाते, तसतशी ती संकुचित आणि गरम होते व गरम आणि कोरडे हवामान आणते. शिवाय, फेज ३ मधील एमजेओ देखील ३०० एमबी स्तरावर रिज तयार करीत आहे. ज्यामुळे समुद्राच्या वाऱ्याला किनारपट्टीच्या भागात जाण्यासाठी आणखी प्रतिकार होतो.