पुणे : शहरातील कर्वेनगर आणि खडकी बाजारामध्ये महिलांचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या दोन घटना, तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोबाईल हिसकावून नेल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत.
पतीसह रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा दुचाकीवर पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील १ लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. १५) रात्री ८.१५ च्या सुमारास कर्वेनगरमध्ये घडली. याप्रकरणी महिलेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत बाजारात घरगुती साहित्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील ७६ हजारांची सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. भरदिवसा खडकी बाजारातील भाजी मंडईसमोरील रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हंबीरनाथ दशरथ सुकाळे (वय २८, रा. भोसरी) याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करीत आहेत.
तृतीयपंथीयाने हिसकाविला मोबाईल
दुचाकीवर घरी चाललेल्या तरुणाला थांबवून एका तृतीयपंथीयाने त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री १०.३० च्या सुमारास साधू वासवानी चौकात घडली. याप्रकरणी तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याशिवाय दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा चावा घेऊन मोबाईल चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ च्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनकडून अलंकार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी अतुल लोंढे (वय ३८, रा. पद्मावती) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.