पुणे : बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, काही औषधे, मादक पदार्थांचा गैरवापर, व्यायामाचा अभाव अथवा अतिरेक, कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे वंध्यत्वाच्या समस्या वाढू लागल्याचे वैद्यकतज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवले आहे.
आजकाल गर्भधारणेमध्ये नानाविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. चुकीची जीवनशैली प्रजननक्षमतेला हानी पोहोचवू शकते. मद्यपान तसेच धुम्रपानाचा अतिरेक, लठ्ठपणा, तणाव, उशिराने लग्न होणे, कुटुंब नियोजनात उशीर होणे हे अनेक घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस, ल्यूटिनिझिंग हार्मोन (एलएच)/ फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) सारख्या संप्रेरकांशी संबंधित जन्मजात समस्या किंवा गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब निकामी होणे यासारख्या परिस्थितीमुळे देखील वंध्यत्वासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिश्मा डाफळे म्हणाल्या, ‘लठ्ठपणा पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेशी संबंधित आहे. अनेक लठ्ठ स्त्रियांना पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) झाल्याचे निदान होते. जास्त वजनामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कार्यात अडथळे येऊन वंध्यत्वासारखी समस्या निर्माण होते. व्यायामाचा अतिरेक आणि विविध औषधे घेतल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. तंबाखूतील कॅडमियम आणि निकोटीन विषाणू शुक्राणूंची गुणवत्ता आणि अंड्याचे उत्पादन कमी करतात. धूम्रपान करणा-या स्त्रियांमध्ये लवकर रजोनिवृत्ती, गर्भपात आणि बाळाला जन्मजात दोष होऊ शकतो. गर्भनिरोधकांचा अतिवापर टाळावा.
----------------------
मद्यपानाचे सेवन केल्याने सेमिनल क्वालिटी कमी होते, टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची संख्या कमी होते. स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन, ओव्हुलेशन किंवा लवकर रजोनिवृत्ती होते. पस्तीशीनंतर कुटुंब नियोजन, कामाचे वाढते तास, एंडोमेट्रिओसिस आणि अकाली गर्भाशयाच्या कार्यात अडथळे येणे यामुळेही प्रजनन क्षमता कमी होते.
- डॉ. माधुरी रॉय, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारणतज्ज्ञ
------------
काय काळजी घ्यावी?
- जंक फूडचे सेवन टाळा.
- मार्गरीन आणि वनस्पती तेलांसारख्या ट्रान्स फॅट्सचे सेवन टाळा,
- धूम्रपान आणि मद्यपान टाळले पाहिजे.
- भरपूर फायबर, बीन्स, गडद हिरव्या पालेभाज्या खा. साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा.
- फोलिक एसिड, व्हिटॅमिन ई, डी आणि लोहपूरक आहार घ्या. योग आणि ध्यान यांसारख्या तंत्रांचा वापर करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.