पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलेच्या पिशवीतून एक लाख दहा हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्धस्वारगेटपोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला भोसरी परिसरात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गेल्या महिन्यात २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून गावी निघाल्या होत्या. बसस्थानकात गर्दी होती. महिलेच्या पिशवीतून चोरट्याने एक लाख दहा हजारांचे दागिने चोरून नेले. महिला गावाहून परतल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक निकिता पवार पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, शनिवारी (दि. ८) पहाटे एका प्रवासी तरुणाच्या पिशवीतून लॅपटाॅप चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. शनिवारी पहाटे प्रवासी तरुण, पत्नी आणि मुलासोबत गावी निघाले होते. बसमधून लॅपटाॅप ठेवलेली पिशवी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. स्वारगेट स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीवर वाहक असल्याची बतावणी करून आरोपी दत्तात्रय गाडे याने बसमध्ये बलात्कार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी स्वारगेट परिसरात गस्त वाढवली होती. आवारात पोलिसांची गाडी, तसेच कर्मचारी तैनात असताना चोऱ्या होत असल्याने एकूणच सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.