Pune: राष्ट्रवादीचे कार्यालय, नेत्यांच्या निवासस्थान परिसरात वाढविला पोलीस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:24 AM2023-07-03T10:24:43+5:302023-07-03T10:26:16+5:30
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले...
पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पदभार स्वीकारला. राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. या राजकीय सत्तासंघर्षामुळे शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील मोदीबाग परिसरातील निवासस्थान परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. शिवाजीनगर डेंगळे पूल परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाच्या परिसरातही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अजित पवार यांचे समर्थक आमदार, पदाधिकारी, त्यांचे कार्यालय आणि निवासस्थान परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यालयांच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.