मंचर: बाजारात नव्या बटाट्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभाव कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्नात घट झाली आहे. बटाटा वानाचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना ७० ते ९० रुपये किलो या भावाने बटाटे बियाणे आणावे लागले. मात्र, किलोला केवळ १७ ते १८ रुपये असा भाव मिळत असल्याने उत्पादकांच्या नफ्यात घट झाली आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात बटाटा वानाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी बियाण्याची आवक कमी प्रमाणात झाली. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे भांडवल अंगावर येत होते. वातावरणातील बदलामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे बटाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादन घटले होते. यावर्षी आंबेगाव तालुक्यात केवळ ५५ टक्के क्षेत्रात बटाटा लागवड झाली असल्याची माहिती महेश मोरे यांनी दिली. बटाटा बियाण्याचे वाढलेले बाजारभाव हे सुद्धा लागवड कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मंचर बाजार समितीत प्रामुख्याने पंजाब राज्यातून बटाटा विक्रीसाठी येतो. मात्र तेथे बटाट्याचा तुटवडा असल्याने भाव कडाडले गेले. यावर्षी बटाटा बियाण्याचे बाजारभावाने उच्चांक गाठला आहे. क्विंटलला पाच हजार ते नऊ हजार रुपये असा भाव बियाण्याला असल्याने लागवड क्षेत्र घटले. बटाटा पिकाला एकरी ७५ ते ८० हजार रुपये इतका भांडवली खर्च आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची अशा होती. सुरुवातीला किलोस ३० ते ३५ रुपये असा भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. मात्र, नंतर बाजारभाव कमी कमी होत गेले. सध्या बटाटा बाजारात १७ ते १८ रुपये किलो या भावाने विकला जातोय. मात्र, हाच बटाटा लागवडीसाठी ७० ते ९० रुपये किलो या दराने विकत घ्यावा लागला होता. गुजरात राज्यातील बटाटा बियाणे उपलब्ध झाले होते. या बियाण्याला भाव सुद्धा कमी होता. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांचा कल पंजाब राज्यातील बटाटा बियाणे घेण्याकडे होता. दरम्यान बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. मात्र, भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा शिल्लक राहत नाही. या भावाने भांडवल वसूल होत आहे. मात्र, नफा कमी शिल्लक राहत असल्याने बटाटा उत्पादक शेतकरी नाराज आहे. बाजारभाव वाढले तर यापुढे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
चौकट
यावर्षी गळीत चांगले निघत आहे. बटाट्याच्या एका पोत्याला १५ ते २२ पिशवी असे गळीत निघत असल्याने उत्पादन वाढले आहे. परिणामी बाजारभाव कमी होऊनही शेतकऱ्यांना जास्त फटका बसलेला नाही.
सचिन ढेरंगे: बटाटा उत्पादक शेतकरी चिंचोडी यावर्षी बियाण्याचे बाजारभाव कडाडले असतानाही धाडसाने १०० पोती बटाटा लागवड केली आहे. सुरवातीला बटाट्याला चांगला भाव मिळत असल्याने अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र बाजारभाव कमी झाले असून शेतातील बटाटा टप्प्याटप्प्याने काढणी करत आहे. सतरा-अठरा रुपये किलो हा भाव पुरेसा नसला. तरी उत्पादन वाढल्याने बऱ्यापैकी नफा मिळत आहे.