पुणे महानगरपालिकेला पिण्यासाठी व जिल्ह्यातील ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील रविवारी ८.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरण प्रकल्प २१ जून रोजी ७.७० टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या आठवड्याभरात क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे ०.७७ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे.त्यामुळे धरण साठ्यात होणारी वाढ कमी झाली आहे.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माॅन्सून दाखल झाल्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणे लवकर भरतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने आता शेतकरीही काहीसा चिंतेत आहे. परंतु, रविवारी शहरात अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या.अशाच सरी धरणक्षेत्रात बरसल्या किंवा संततधार पाऊस पडला तर धरणाची पाणी साठ्याची पातळी वाढेल, असेही पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
-------
खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा
वरसगाव : २.८४ टीएमसी
पानशेत : ४.०५ टीएमसी
खडकवासला : १.०३ टीएमसी
टेमघर धरणात : ०.५७ टीएमसी