लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. शाळेत प्रत्यक्ष जायला न मिळणे, मैैदानी खेळ बंद असणे, मित्र-मैैत्रिणींशी भेट न होणे, यामुळे मुलांच्या आयुष्यात प्रचंड मर्यादा आल्या आहेत. मुले पहिल्यांदाच अशा ताणाचा सामना करत आहेत. त्यामुळे पालक आणि मुलांमधील वादविवादही वाढले आहेत. वादविवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी दोन्ही पिढ्यांची एकमेकांना समजून घेणे, संवाद साधणे आणि चर्चा करून मध्यम मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ऑनलाईन शिक्षणावरून घरात झालेल्या वादातून आईने मुलाचा गळा दाबून स्वत:ही आत्महत्या केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. मुंबईतही पालकांनी ऑनलाईन अभ्यासात लक्ष दे, असा आग्रह धरल्याने मुलीने आईला मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली. या घटना प्रातिनिधिक असल्या तरी यावरून कुटुंबांमध्ये वाढत चाललेला ताण, वादांना लागणारे हिंसक वळण धोक्याची घंटा ठरत आहेत. कोरोनाचे दूरगामी आर्थिक, सामाजिक, मानसिक परिणाम झालेले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी संवादाचा पूल बांधणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
“ऑनलाईन शिक्षणाच्या वादातून हिंसक घटना घडण्यापर्यंतचा प्रवास हा रागातून, मानसिक ताणातून निर्माण झालेला असतो. ‘न्यू नॉर्मल’मधील बदल अंगवळणी पडण्यास प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो. सध्या ऑनलाईन शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याने शिक्षणाची गुणवत्ता, परिणामकारकता कमी-अधिक होणे साहजिक आहे. ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम यामुळे मुले, पालक बराच वेळ घरात असल्याने चिडचिड, वादावादी वाढली आहे. मुलांच्या आयुष्यातील ‘ह्यूमन टच’ हरवल्याने त्यातून नैैराश्य आले आहे. वाद विकोपाला जाणार नाहीत, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी, बदलत्या परिस्थितीचे आणि त्यामध्ये कसे वागावे, याबाबत मुलांनाही समजावून सांगायला हवे. मुलांना शक्य तितका पाठिंबा द्यायला हवा, शक्य तितका त्यांच्या अभ्यासात सहभाग घ्यावा.”
- डॉ. नितीन अभिवंत, मानसोपचारतज्ज्ञ, ससून रुग्णालय
चौकट
“सोशल गॅदरिंग नसल्यामुळे, घरून काम सुरू असल्यामुळे पालक अडकून पडले आहेत. त्यांचा राग मुलांवर निघतो आहे. मुलेही कायम स्क्रीनसमोर असल्याने त्यांचे बाहेर जाणे, मित्र-मैैत्रिणींना भेटणे बंद आहे. यातून मुलांमध्ये नैराश्य, असुरक्षितता, संभ्रम यांचे मिश्रण पहायला मिळत आहे. पालकांनी मुलांची भावनिक आंदोलने समजून घ्यायला हवीत. भावनिकदृष्ट्या त्यांच्याबरोबर असावे. मुलांच्या स्क्रीन टाईमचे वेळापत्रक ठरवणे गरजेचे आहे. आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने मुलांना एखादे वेळी बाहेर फिरायला घेऊन जावे, त्यांच्या अडचणी संवाद साधून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सततची चिडचिड हे नैैराश्याचे पहिले लक्षण असते. पालक किंवा मुले कोणीही निराश न होता ‘हे दिवसही जातील’ यावरील विश्वास दृढ असावा.”
-डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ