पिंपरी : कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतराजणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते.
धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे संधिवाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजारात सांधे आणि त्यांच्याशी संबंधित स्नायू, अस्थिबंध यांना आजार होतात. संधिवात हा दुर्धर आजार मानला जातो; परंतु तो आजार नसून लक्षण आहे. त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वेळेत इलाज घेतले जात नसल्याने गुडघेदुखीत वाढ होते.
महिलांमध्ये अधिक प्रमाण
संधिवात साधारणतः पन्नाशी उलटलेल्यांना होतो. देशातील हे प्रमाण १७ टक्के असून, त्यात महिलांमध्ये प्रमाण अधिक आहे. महिला जमिनीवर बसून काम करतात. वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्यात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. संधिवाताकडे दुर्लक्ष केल्याने बहुतेक रुग्णांना उर्वरित आयुष्य अपंगांसारखे काढावे लागते.
युवापिढीत वाढतोय आमवात..
शरीरातील सांध्यामध्ये दुखणे येणे म्हणजे संधिवात असतो. यातीलच आमवात हा प्रकार असून, तो रक्तातून उद्भवतो. संधिवातामध्ये प्रामुख्याने पायाचे गुडघे दुखतात. परंतु, आमवात रक्तातून होत असल्याने तो शरीरातील प्रत्येक सांध्यापर्यंत पोहोचत असल्याने सर्व शरीराला दुखणे लागते. सुरुवातीला लहान जॉइंट म्हणजे बोटांच्या सांध्यापासून त्याची सुरुवात होते. आमवाताचे प्रमाण युवापिढीमध्ये म्हणजे तिशीनंतर येत असतो.
संधिवात होण्याची कारणे...
- वार्धक्य, सांध्यांना पूर्वायुष्यात झालेली इजा आणि अतिश्रमामुळे झीज- बैठी कामे आणि व्यायामाच्या अभावाने आलेली स्थूलता- ‘ड’ जीवनसत्त्व मिळू न शकल्याने दुर्बल झालेली हाडे- अतिधूम्रपान तसेच कॉफीच्या अतिसेवनाने आमवात वाढतो.
अशी घ्यावी काळजी...
- योग्य पद्धतीने नियमित व्यायाम- पोहणे किंवा सायकलिंग करणे- उंचीच्या योग्य प्रमाणात वजन राखणे- अचूक निदान व योग्य उपायांबाबत जागरूकता- लक्षणे आढळताच तज्ज्ञांचा सल्ला व इलाज