पुणे : छेडछाड, अश्लील शेरेबाजी, पाठलाग, नोकरीच्या ठिकाणी होणारे शोषण, लैंगिक सुखाची मागणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने होणारी हेळसांड यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा महिला खुलेपणाने तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. नेमकी हीच अडचण ओळखून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नोकरदार महिलांना सुरक्षा देण्याकरिता अभिनव उपक्रम राबवत ‘बडी कॉप’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तब्बल एक लाख महिलांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. ८०० व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून या महिलांशी दैनंदिन संपर्क ठेवण्यात येत असून, त्यांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात आहेत.संगणक अभियंता असलेल्या रसिला राजू हिचा हिंजवडीमध्ये सुरक्षारक्षकाने खून केला. त्यापूर्वी अंतरा दास या अभियंता तरुणीचाही खून झालेला होता. त्यानंतर आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबत विचारविनिमय सुरू असतानाच बडी कॉपची संकल्पना समोर आली.आयुक्त शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांकडून महिलांचे व्हॉट्स अॅप ग्रुप करण्यात आले. स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विविध कंपन्या, महाविद्यालयांमध्ये जाऊन या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाला प्रतिसाद मिळायला लागल्यावर त्याची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात आले. आयटी व्यतिरिक्त बँका, हॉटेल, कॉपोर्रेट्स आदी खासगी क्षेत्रातील आणि शासकीय नोकरदार महिलांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. कामाच्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बडी कॉप असणार आहे. हे कर्मचारी नेमून दिलेल्या महिलांच्या कोणत्याही अतितातडीच्या मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध आहेत.नोकरदार महिलांपुरते मर्यादित न राहता महाविद्यालयीन तरुणींच्या समस्या सोडवण्यासाठी बडीकॉप व्हॉट्स अॅप ग्रुप सुरू करण्यात आले. हा उपक्रम पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीन आणि चारच्या हद्दीमध्ये सुरू आहे. या भागातच सर्वाधिक कंपन्या आहेत.>चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलसेंटरमध्ये काम करणा-या तरुणीने बडी कॉप व्हॉट्सअॅप ग्रुपवर मदत मागितली. उपनिरीक्षक संदीप साळुंखे यांनी पथकासह तरुणीला फोन केला. काय मदत हवी ते विचारून घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी कामाच्या ठिकाणी काम करणारा 30 वर्षीय तरुण तिला ' तू छान दिसतेस, मला आवडतेस' असे म्हणत असल्याचे सांगितले. तसेच, तो तिला खानाखुणा आणि हावभाव करून त्रास देत होता. तिने याबाबत विचारणा केल्यावर त्याने अपशब्द वापरले होते. तिने कंपनीकडे तक्रार दिली होती. कंपनीने त्याला लेखी ताकीद दिली होती. मात्र, तरीही तो सुधारला नव्हता. ही तक्रार ऐकून घेताच पोलिसांनी तिची तक्रारार घेऊन चंदन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली.>खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील महिलांच्या स्वच्छता गृहामध्ये एक तरुण घुसला होता. त्याने एका महिलेला धक्का मारून त्यांचा विनयभंग केला होता. ही तक्रार प्राप्त होतात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी राजकमल राजबहादूर यादव या आरोपीला अटक केली.>कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहात असलेली महिला वडगाव शेरी येथे पतीच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी पतीने त्यांना मारहाण केली. त्यांना बाहेर ढकलून दिले. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पीडित महिलेने बडी कॉपवर तक्रार दिली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन महिलेला वैद्यकीय व अन्य मदत पुरवली. तसेच तिची तत्काळ तक्रार दाखल करून घेतली.
नोकरदार महिलांमध्ये वाढली सुरक्षेची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:16 AM