लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडचा एक भेसूर चेहरा म्हणजे शहरात फोफावणारा प्लॅस्टिक कचरा. गेल्या काही महिन्यांत भोसरी आणि परिसरातील पदपथांवरील हजारो विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. रोज जमा होणाऱ्या या लाखो प्लॅस्टिक पिशव्या कचऱ्यात जाऊन भटक्या प्राण्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहेत. तसेच अविघटनशील प्लॅस्टिक पिशव्यांमुळे कचऱ्याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. याबाबत महापालिकेने वेळोवेळी बंदीची भाषा केली असली, तरी ग्राहकांची मागणी व सोय पाहता विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवला आहे. तरी मॉल व दुकानदारांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची बंदी अमलात आणण्यात पालिकेला काही प्रमाणात यश आले आहे.कापडी पिशव्यांचा वापर अनिवार्य केला असताना त्या वापरासाठी कोणीही पाहिजे, तितका धजावत नाही. जो तो प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये साहित्य, वस्तू नेण्यालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला प्लॅस्टिक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. गल्लीबोळात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या हे त्याचेच उदाहरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्लॅस्टिक पिशव्या वापराचे निकष व नियम ठरवून दिले आहेत. तरीही शहरातील हातगाड्या व दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत असल्याचे वास्तव आहे.पर्यावरणाला धोका असल्याने शासनाने कॅरिबॅग वापरावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यासाठी कायदाही केला. पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅगमुळे आरोग्याला धोका, पावसाळ्यात तुंबणारी गटारे यांची नेहमी चर्चा असते. पण यासाठीचा कायदा करण्यापलीकडे शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. लाल, पिवळ्या व काळ्या रंगातील प्लॅस्टिक कॅरिबॅग विक्री व्यवसाय शहरामध्ये चांगलाच फोफावलेला आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वाढला वापर
By admin | Published: May 23, 2017 5:02 AM