पुणे : लॉकडाऊनचा काळ हा खवय्यांसाठी जणू मेजवानीचा ठरला. स्वादिष्ट चमचमीत पदार्थांवर यथेच्छ ताव मारणे हा जणू दिनक्रमच झाला होता. यातच कुटुंबातील सदस्यांच्या आग्रहानुसार वेगवेगळे पदार्थ बनवण्याकडे बहुतांश महिलांचा कल होता. मात्र, कुठल्याही आजाराचे मूळ कारण हे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे हेच असल्याने चमचमीत पदार्थांपेक्षाही पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त आहाराबाबत आता गृहिणी अधिक जागरूक झाल्या आहेत. त्यानुसार बहुतांश गृहिणींनी स्वयंपाकघरात बदल केले आहेत.
कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करता येईल, याबाबत आहारतज्ज्ञांचा देखील सल्ला घेतला जात आहे. डाळी, कडधान्य यांसह सूप, सॅलेडचा वापर जेवणात वाढतो आहे. शाकाहारी घरांमध्ये पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांना प्राधान्य मिळत आहे. रोज ताजी फळे, भाज्या आणण्यावरही अनेकांनी भर दिला आहे.
अन्नातील पोषक घटक सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासूनची बदलती जीवनशैली, फास्ट फूड आणि जंक फूडच्या अतिरिक्त वापरामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येत आहे. मैदानी खेळांचा अभाव त्यातच ‘शाळा बंद’मुळे देखील मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मुलांना एकाच ठिकाणी पाच ते सहा तास बसून राहावे लागते. त्यांच्यात स्थूलता वाढीस लागली आहे. कोरोनाने सर्वांनाच एक धोक्याचा इशारा दिला आहे.
यातच कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात असल्याने गृहिणींनी कमालीचा धसका घेतला आहे. त्यामुळे निव्वळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात अधिकाधिक प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश होण्याची गरज गृहिणींनी ओळखली आहे. कुठल्या पदार्थातून अधिकाधिक व्हिटॅमिन किंवा पौष्टिक घटक मिळ्तील, दररोजचा आहार कसा असायला हवा, जेवणामध्ये कोणत्या गोष्टींचा अधिकाधिक समावेश असायला हवा याबाबत महिला अधिकाधिक जागरूक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे.
चौकट
रोज कोशिंबीर, कडधान्ये आहारात
“कोरोनामुळे संपूर्ण जीवनशैलीतच आमूलाग्र बदल झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याशी कोरोनाचा संबंध आहे एवढे कळल्यानंतर मग ती वाढविण्यासाठी आमच्यासह अनेकांनी व्हिटॅमिन किंवा होमिओपॅथीच्या गोळ्या, काढे यावर भर दिला. पण, खरी रोगप्रतिकारशक्ती ही अन्नातून वाढू शकते हे उमगले. त्यानुसार आहारात जास्तीत जास्त प्रथिनेयुक्त घटक वापरले जात आहेत. रोज जेवणात वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर, किमान एका तरी कडधान्याचा वापर सुरू केला आहे.”
-अमृता देशपांडे, गृहिणी
चौकट
मिसळ-पावभाजीवर बंधन
“लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील सर्वच सदस्य घरात असल्याने प्रत्येकाच्या कधी पावभाजी, कधी मिसळ, कधी पिझ्झा अशा फर्माईशी व्हायच्या. मात्र, चमचमीत पदार्थांच्या सेवनामुळे ॲसिडीटी, पित्त या समस्या उदभवू लागल्या. तेव्हा ठरवलं की या पदार्थांपेक्षा सकस आहारावर भर द्यायला हवा आणि त्यानुसार स्वयंपाकघरात बदल केला.”
- वैशाली इनामदार, गृहिणी
चौकट
पोषक पदार्थांवर भर
“रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आहारात अधिकाधिक वापर झाला पाहिजे. मुलांना उकडलेली अंडी देणे अधिक चांगले आहे. कडधान्ये, डाळी आणि सुकी फळे-बियांवर अधिक भर द्यायला हवा. मसालेदार पदार्थांमध्ये लवंगी, दालचिनी, मिरे किंवा जिरे पूड यांचा चिमूटभर तरी समावेश केला पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या मसाल्यांचा खूप उपयोग होतो. कोशिंबिरीमध्ये दालचिनीची पूड कुणी टाकत नाही. त्यात सहसा जिऱ्याची फोडणी देतात त्याऐवजी जिऱ्याची पूड टाकली तर अधिक उत्तम आहे. या मसाल्यांच्या पदार्थांची पूड करून ठेवावी आणि ती अदलून-बदलून वापरावी. गृहिणींनी स्वयंपाकघरात स्वत: काही प्रयोग करून पाहावेत.”
-आश्लेषा भागवत, आहारतज्ज्ञ
----