उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात डेंग्यूसह साथीच्या रुग्णांमध्ये अजूनही वाढ होत असून आरोग्य विभाग कधी जागा होणार, असा प्रश्न आहे. पॅथॉलॉजी लॅबकडून रक्त, लघवी, डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा स्वाइन फ्लू या व अन्य तपासण्या करताना लूट होतेय,अशी जनतेतून तक्रार केली जात असून उरुळी कांचनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.
परिसर स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहेच. यासोबतच गावच्या मध्यभागातून जाणाऱ्या ओढ्याच्या आजूबाजूचा परिसर दूषित झाला आहे. हवामानातील विचित्र बदलामुळे व परिसरात वाढलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी योग्य दक्षता व खबरदारी घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक घरामध्ये पाणी साठवतात. त्यामध्ये डासांच्या अळ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गरजेपुरतेच पाणी साठवावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे बापूसाहेब धुमाने यांनी व्यक्त केले.उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व तपासण्या मोफत करण्याची सोय उपलब्ध केली आहे. तसेच रुग्णांना दाखल करून घेऊन औषधोपचार करण्याची सोय केली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी दवाखान्यातून या सोयींचा लाभ घ्यावा.उरुळी कांचन परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत उरुळी कांचन, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक डॉक्टर व पॅथॉलॉजी लॅबचालक व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहण्यासाठी लवकरच बैठक बोलावून योग्य त्या सूचना देण्यात येतील.- डॉ. दीपक माने, जिल्हा आरोग्य अधिकारी