पुणे : नाट्यप्रशिक्षण वर्गात केवळ नाट्यविषयकच प्रशिक्षण मिळते असे नाही, तर संवाद कौशल्य वाढू शकते, चांगले कसे वागायचे, एकमेकांविषयी आदर कसा बाळगायचा याचेही प्रशिक्षण आपोआप मिळत जाते. सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष संवाद साधण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी केले.
गेली 42 वर्षे व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे लॉकडाउनंतर प्रथमच युवा नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन दामले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, दीपाली निरगुडकर उपस्थित होते.
दामले म्हणाल्या, नाट्यप्रशिक्षणाद्वारे अंतर्मनामध्येही परिणामकारकता दिसून येते. व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यप्रशिक्षण उपयुक्त ठरू शकते.
प्रकाश पारखी यांनी नाट्य संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
थिएट्रॉन संस्थेच्या विविध नाट्य प्रयोगांमुळे युवा वर्गात लोकप्रिय असलेला नाट्यसंस्कार अकादमीचा माजी विद्यार्थी सूरज पारसनीस या वर्गाचे संचालन करीत आहे. या प्रशिक्षण शिबिरात चित्रपट, मालिकांमधील ओंकार गोखले, सक्षम कुलकर्णी, शिवराज वायचळ, विराजस कुलकर्णी हे कलावंत आणि नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख प्रकाश पारखी मार्गदर्शन करणार आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस शिबिरार्थींचा भरत नाट्य मंदिरात नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
...